शहराच्या धकाधकीतून काही दिवसांची उसंत घेऊन मी माझ्या माहेरच्या गावी निघाले होते, एका अनोळखी प्रवासाला. मन अशांतीने ग्रासले होते आणि डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. कसलीतरी शांतता हवी होती, काहीतरी निखळ, नैसर्गिक.
माहेरी पोहचायच्या आधी एका लहानशा गावाच्या वेशीवर पोहोचल्यावर चौकशी करत मी एका घराची वाट विचारली. "त्या पांदी वाटेतून जा सरळ, जिथे गुंजांच्या वेली दिसतील दोन्ही बाजूंनी," एका वयोवृद्ध माणसानं दिशा दाखवली.
मी त्या पांदित पाऊल टाकलं. ती खरोखरच साधी वाट होती. सिमेंटचे रस्ते नाहीत, गाड्यांचा आवाज नाही. शहराची गर्दी नाही, फक्त पायाखाली येणारी माती आणि दोन्ही बाजूंनी वाढलेली हिरवळ. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाटेत नाजूक वेलींवर गुंजांचे छोटे लाल-काळे मणी लगडलेले दिसत होते आणि रंगबिरंगी फुलपाखरे य्यावर मनसोक्त खेळत होती. पुढे गेल्यावर सुमंगी, मेढी काटेरी, बाबळीची आणि पांढऱ्या फुलांनी लगडलेल्या काटेरी सावरीची झाडेही दिसली. त्यातून चिमणी पाखरांची चिवचिव व किलबिल कानावर पडत होती. प्रत्येक झाड आपापल्या अस्तित्वात रमलेलं होतं. काट्यांमध्येही एक वेगळं सौंदर्य होतं. अणि त्या दिवशी मला ते जास्तच जाणवत होतं.
चालता चालता दूरवर उंच जांभळा डोंगर दिसू लागला. आकाशाच्या निळ्या रंगात तो उठून दिसत होता. डोंगराच्या पायथ्याशी पसरलेलं हिरवट काळसर रान धूसर दिसत होतं, पण त्याची विशालता जाणवत होती. रानपाखरांचे मंजुळ आवाज कानावर पडत होते आणि सळसळणारा वारा अंगावरून वाहत होता. या सगळ्या वातावरणात एक प्रकारची शांतता होती – जी गंभीर होती, पण त्याच वेळी अत्यंत कोमल, मनाला आधार देणारी होती. माझ्या शहरातील गोंधळलेल्या मनाला ही शांतता खूप काही देऊन जात होती.
चालत चालत मी त्या घरापाशी पोहोचलो. ते खरंच एक चिमुकलं झोपडं होतं. साध्या मातीच्या भिंती आणि कौलारू छत. पण त्याभोवती एक प्रसन्न वलय होतं. घराच्या दारात एक काळंबेरं कोकरू आपल्याच नादात बागडत होतं.
आणि मग माझं लक्ष दारात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे गेलं. ती एक स्त्री होती. तिने गुंजांच्या रंगाचे, लालभडक आणि गुडघ्यापर्यंत तंग नेसलेले लुगडे परिधान केले होते. तिच्या गळ्यात लाल मण्यांची पोत आणि मध्ये एक रुपयाची जुनी सरी होती. तिचे अलंकार साधे होते, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज जाणवत होता.
तिचे डोळे साधे आणि निष्पाप होते, पण त्यात एक प्रकारची निर्भयता आणि हास्य होतं. तिच्या चेहऱ्यावरचे ते कोवळे, किंचितसे हास्य पाहिलं आणि माझं मन कशाततरी हरवून गेलं. तिच्या डोळ्यात शहरी जगाची चिंता नव्हती, फसवणूक नव्हती, धावपळ नव्हती. फक्त होती एक निर्मळ शांतता.
मी तिच्याकडे आले होते, खरेतर मनात काहीतरी वेगळेच विचार घेऊन. शहरात शिकलेली 'नागर नीती' - म्हणजे व्यवहारी जगाचे नियम, चातुर्य, धूर्तपणा - हे सारं तिला सांगावं, तिला या जगासाठी तयार करावं, असं काहीसं मनात होतं. पण तिला पाहिल्यावर, तिच्या सभोवतालची शांतता अनुभवल्यावर माझ्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला.
हे तिचं जीवन म्हणजे सौंदर्याचा एक शांत जलाशय होता. जिथे निसर्ग होता, साधेपणा होता, आणि डोळ्यात एक निखळ हास्य होतं. अशा या शांत, सुंदर जलाशयात मी माझ्या शहरीपणाचे, माझ्या 'नागर नीती'चे खडे टाकून ही शांतता भंग करावी का? तिच्या डोळ्यांतील निर्भयता आणि चेहऱ्यावरचे हास्य हिरावून घ्यावे का?
माझ्या प्रश्नाचे उत्तर मला त्या शांततेतच मिळाले. नाही. काही गोष्टी जशा आहेत तशाच सुंदर असतात. त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे त्यांचं सौंदर्यच नष्ट करण्यासारखं आहे. मी तिच्याकडे पाहिलं, एक स्मित दिलं आणि त्या शांत जलाशयाची शांतता न भंगवता तिथून निघाले. माझ्या मनात आलेला तो प्रश्नच माझ्यासाठी सर्वात मोठा धडा होता.
ग्रामीण जीवनाची साधेपणा, निसर्गाचे सौंदर्य आणि त्यातील निखळ शांतता यांचे एक अप्रतिम अस्तिव आहे. शहरी धावपळीपासून दूर असलेल्या एका साध्या घराकडे जाणारी वाट, तेथील निसर्ग आणि त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे हृदयस्पर्शी प्रेमळ वागणूक. मला पुन्हा एकदा मातीशी, निसर्गाशी जोडल्याची अनुभूती देत होती.
मला काहीवेळ वाटलं ती स्त्री नसून आपली पृथ्वी आहे जी मला आठवण करून देते की खरे सौंदर्य आणि शांतता ही भौतिक गोष्टीत नसून ती निसर्गाच्या सान्निध्यात आणि साध्या, निखळ जीवनात असते. शहरी धावपळीपेक्षा या साध्या जीवनातील शांतता किती मौल्यवान आहे, हा संदेश ही मला देऊन जाते. हे केवळ एका घराचे वर्णन नाही, तर एका जीवनशैलीचे, एका संस्कृतीचे आणि हरवत चाललेल्या एका जगाचे चित्र आहे.
